17 Sep 2026, Thu

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

amravati breaking

पावसाळ्यातील आरोग्य समस्या, बंद आरओ प्लांट आणि निकृष्ट पुलाच्या कामावरून प्रशासनाला धारेवर

तिवसा : तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असताना आणि अनुसूचित जाती वस्त्यांमधील विविध नागरी प्रश्न प्रलंबित असताना, वंचित बहुजन आघाडीने आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांसाठी पक्षाच्या तिवसा तालुका पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर ठोस कार्यवाही झाली नाही, तर गावकऱ्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चिखल, अस्वच्छता आणि पाण्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित नागरी समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

दापोरीतील बंद आरओ प्लांट सुरू करण्याची मागणी

दापोरी येथील बंद असलेला आरओ वॉटर प्लांट तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. हा प्लांट नेमका कोणत्या कारणामुळे बंद आहे आणि त्यामागे काही अनियमितता आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे बंद असलेल्या आरओ प्लांटबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून तो पुन्हा सुरू करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

चिखल आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न

पावसाळ्यात अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला. अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांची स्वच्छता करून चिखल आणि घाण तातडीने हटवावी, तसेच गावागावांत स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात डास आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने प्रत्येक गावात नियमित धूर फवारणी करण्यात यावी, अशीही मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

‘अवघ्या एका वर्षात पूल खचला; चौकशी करा’

वरूडा येथील अनुसूचित जाती वस्तीतील पुलाच्या कामावरूनही वंचित बहुजन आघाडीने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. बांधकामानंतर अवघ्या एका वर्षात हा पूल खचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात आले का? कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले का? याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणारे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. सरकारी निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचा दर्जा टिकला पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.

८ दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलन

निवेदन सादर केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्यांवर कार्यवाही झाली नाही, तर संबंधित गावांतील नागरिकांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सिद्धार्थ कटारने, भुजंग वावरे, अनिल गाडगे, श्रीकृष्ण वावरे, सचिन बाखडे, अभिषेक मनोहरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता प्रशासन या मागण्यांवर आठ दिवसांत काय निर्णय घेते, की पंचायत समितीसमोर आंदोलन उभे राहते, याकडे तिवसा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *