17 Sep 2026, Thu

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

amravati

मुंबई, ११ सप्टेंबर २०२६ : गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील अनेक भागांसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई वेधशाळेने पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाऊस सुरू असताना विशेषतः विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

११ सप्टेंबरला विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा इशारा

११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर जाणे टाळण्यासह सुरक्षित ठिकाणी राहण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

१२ सप्टेंबरला मोठ्या भागात पावसाची शक्यता

१२ सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा प्रभाव आणखी मोठ्या भागात जाणवण्याची शक्यता आहे. धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि रायगड या भागांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्क केले आहे. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचाही समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१३ सप्टेंबरला मुंबई-पुण्यासह विदर्भातही अलर्ट

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि रायगडसह पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट आणि रत्नागिरी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. म्हणजेच कोकणापासून पुणे आणि मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत अनेक भागांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे.

१४ सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती बदलती राहण्याची शक्यता आहे.

विजांचा कडकडाट असेल तर काळजी घ्या!

वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शक्यतो झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा विजेच्या खांबांजवळ थांबणे टाळावे. पाऊस आणि वादळी वारे सुरू असताना अनावश्यक प्रवास टाळणेही सुरक्षित ठरू शकते. दरम्यान, ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान कोणत्या भागात किती पाऊस पडतो आणि हवामान विभागाचा हा अंदाज प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, याकडे आता नागरिकांसह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *