
जयपूर : घर किंवा रूम शोधताना आपली जात सांगावी लागेल, असा विचार कदाचित अनेकांना अस्वस्थ करणारा वाटेल. मात्र, जयपूरमध्ये अनेक वर्षांपासून राहत असल्याचे सांगणाऱ्या चिराग सिद्धार्था यांनी इंस्टाग्राम वर केलेल्या एका पोस्टमध्ये असाच अनुभव मांडला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत राहणारा मित्र SC समुदायातील असल्यामुळे रूम शोधताना त्याची जात सांगण्याची वेळ आली, तर घरमालक थेट नकार देतील, अशी भीती वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर जातीय भेदभाव आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.
“मला माझी जात सांगावी लागते, कारण मी ब्राह्मण आहे…”
चिराग सिद्धार्था यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, ते जयपूरमध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना रूम बदलायची वेळ येते, तेव्हा घरमालकाला आपली जात सांगावी लागते. यामागे एक वेगळे कारण असल्याचे ते सांगतात. त्यांच्यासोबत राहणारा व्यक्ती SC समुदायातील आहे. त्याची जात घरमालकाला सांगितली तर “१० पैकी ८ लोक थेट नकार देतील”, अशी शक्यता असल्याने त्या मित्राला ते आपला भाऊ असल्याचे सांगतात, असा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. ही परिस्थिती सांगताना त्यांनी आपल्या मित्राबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
तो पैशांमध्येही माझ्यापेक्षा श्रीमंत आहे…
चिराग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासोबत राहणारा मित्र आर्थिकदृष्ट्याही त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम आहे. एवढंच नाही, तर संस्कार, मर्यादा आणि शिक्षणाच्या बाबतीतही तो आपल्यापेक्षा चांगला असल्याचे ते सांगतात. म्हणजे व्यक्तीचे शिक्षण, आर्थिक परिस्थिती किंवा स्वभाव कसा आहे, यापेक्षा केवळ त्याची जात पाहून घर देण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर हा प्रश्न केवळ एका रूमपुरता मर्यादित राहत नाही, असा मुद्दा त्यांच्या पोस्टमधून पुढे येतो. “सारी चीजों में वो मेरे से अच्छा है, लेकिन जब भी रूम ढूंढने की बात आती है, तब जात सामने येते,” अशा आशयातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
जयपूरसारख्या मोठ्या शहरातही अशी परिस्थिती?
चिराग यांनी पुढे म्हटले आहे की, जयपूरसारख्या मोठ्या शहरातही अशी परिस्थिती असेल, तर देशातील इतर शहरांमध्ये काय स्थिती असेल, हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. हा अनुभव केवळ जयपूरपुरता मर्यादित नसून अनेक शहरांमध्ये अशी परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच, अशाच प्रकारचा अनुभव आलेल्या लोकांनी आपापल्या शहराचे नाव कमेंटमध्ये सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रूमपासून आरक्षणापर्यंत थेट सवाल
या अनुभवातून चिराग यांनी आरक्षणाच्या चर्चेकडेही लक्ष वेधले आहे. “आरक्षण हटवायचं कसं? आणि का हटवायचं? मी त्याला साथ कशी देऊ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, समाजात आजही जात पाहून व्यक्तीला स्वीकारले जात असेल आणि एखाद्याला स्वतःची किंवा आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीची जात लपवण्याची वेळ येत असेल, तर आरक्षणाची गरज का निर्माण झाली, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या पोस्टमधील पुढील भागात सामाजिक भेदभाव, समानता आणि आरक्षण यांचा संबंध जोडत त्यांनी आपला वैयक्तिक अनुभव व्यापक सामाजिक प्रश्नाशी जोडला आहे.
एका रूमच्या अनुभवाने उभा केला मोठा प्रश्न
या पोस्टमधून मांडलेला मुख्य मुद्दा एवढाच आहे की, व्यक्तीची ओळख तिच्या जातीतून ठरवली जावी का? शिक्षण, पैसा, स्वभाव आणि कर्तृत्वापेक्षा जात महत्त्वाची ठरत असेल, तर समानतेच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
चिराग सिद्धार्था यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली असून, त्यांच्या अनुभवावरून आरक्षण, जातीय भेदभाव आणि सामाजिक समानता याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, पोस्टमध्ये मांडलेला रूम नाकारण्याचा अनुभव हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आणि दावा आहे; त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आलेली नाही.
