17 Sep 2026, Thu

वाढदिवसाचा खर्च टाळून समाजासाठी दिलं योगदान; मनिष खरे यांनी गुरुकुल संकुलाला दिलं स्वच्छतेचं ‘गिफ्ट’

Manish Khare

मोझरी, १० सप्टेंबर २०२६ : वाढदिवस म्हटलं की केक, शुभेच्छा, मित्रमंडळी आणि सेलिब्रेशन हे चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र, आपल्या आनंदाचा दिवस समाजासाठी उपयोगी ठरावा, असा विचार करत वाढदिवस साजरा केला तर? मोझरी येथील शौर्य फाउंडेशनचे सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते मनिष खरे यांनी याच विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी गुरुकुल संकुल, मोझरी येथे स्वच्छता साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

केकऐवजी स्वच्छतेचं साहित्य; उपक्रमाची चर्चा

शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लांडगे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुकुल संकुलाला आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असणारे विविध साहित्य देण्यात आले. यामध्ये झाडू, खराटे, पोचा, वायपर, हॅण्डवॉश, हार्पिक, फिनाईल, ब्रश यासह इतर आवश्यक स्वच्छता साहित्याचा समावेश होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च करण्यापेक्षा एखाद्या संस्थेला किंवा समाजाला प्रत्यक्ष उपयोगी पडेल, अशी मदत करावी, या विचारातून हा उपक्रम करण्यात आला. त्यामुळे हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीच्या आनंदापुरता न राहता स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश देणारा ठरला.

‘वाढदिवसाचा आनंद इतरांसोबत वाटला’

गुरुकुल संकुलासारख्या ठिकाणी नियमित स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्याच दृष्टिकोनातून हे साहित्य देण्यात आल्याने संकुलाच्या दैनंदिन स्वच्छता व्यवस्थेला त्याचा उपयोग होणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल गुरुकुल संकुलाच्या वतीने शौर्य फाउंडेशन आणि मनिष खरे यांचे कौतुक करण्यात आले. वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

शौर्य फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. त्याच मालिकेत मनिष खरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वतःच्या आनंदासोबत समाजाचाही विचार’ हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला गुरुकुल संकुलचे रवीदादा मानव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भुजंग वावरे, भारत दहाट, रोहन वावरे आणि अनिल गाडगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. पण त्या दिवसाचा आनंद जर एखाद्या सामाजिक कामासाठी वापरला, तर त्या आनंदाला आणखी एक वेगळीच अर्थपूर्ण बाजू मिळते. मोझरीतील मनिष खरे यांच्या या उपक्रमाने याच विचाराला अधोरेखित केले असून, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला दिलेलं स्वच्छतेचं हे ‘गिफ्ट’ सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *