आंदोलक सागर भवते यांना बैठकीत प्रवेश नाकारल्याचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर बौद्ध बांधवांची नाराजी

तिवसा : तालुक्यातील सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी तिवसा तहसील कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, आंदोलनकर्ते तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांना बैठकीत प्रवेश नाकारल्याचा आरोप झाल्यानंतर सारसी येथील बौद्ध बांधवांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.सारसी येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बौद्ध बांधवांचे म्हणणे आहे. त्यानंतर या मागणीसाठी बौद्ध बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री १० वाजेपर्यंत सुरू होते.या आंदोलनादरम्यान सागर भवते यांनी तिवसा तहसीलदारांशी चर्चा केली होती. त्यावेळी संबंधित प्रकरणावर दोन्ही अर्जदारांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक ३१ ऑगस्ट रोजी घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे भवते यांनी सांगितले.त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा होती. मात्र, बैठकीच्या वेळी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी आंदोलन करणारे सागर भवते यांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप बौद्ध बांधवांनी केला. त्यामुळे उपस्थितांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि बैठकीवर बहिष्कार टाकला.
‘सर्व संबंधितांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय नको’
या प्रकरणात प्रशासनाने सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी भूमिका सारसी येथील बौद्ध बांधवांनी घेतली आहे. आंदोलक सागर भवते यांच्यासह समस्त बौद्ध बांधवांशी तालुका प्रशासनाने चर्चा करावी आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत प्रवेशद्वाराच्या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रशासनाने कोणत्याही एका गटाची बाजू न घेता सर्व संबंधितांना आपली भूमिका मांडण्याची समान संधी द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘कायद्यानुसार रस्त्यावरची लढाई लढू’ – सागर भवते
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सागर भवते यांनी प्रशासनाला इशारा दिला. २५ ऑगस्टच्या आंदोलनादरम्यान तहसीलदारांनी ३१ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सोमवारी बैठकीत आपल्यालाच प्रवेश नाकारण्यात आल्याने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधितांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भवते यांनी दिला.आता या प्रकरणावर प्रशासन सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढते का, की हा वाद आणखी चिघळतो, याकडे सारसीसह संपूर्ण तिवसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
