
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या नावाखाली काय चाललंय, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. माजी आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे—आणि कारणही तसंच आहे.यशोमती ठाकूर म्हणतात की, काशी विश्वनाथ कॉरिडॉरसाठी अनेक छोट्या मंदिरे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळे आधीच तोडली गेली. पण आता धक्कादायक बाब म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीत जीर्णोद्धार केलेला प्रसिद्ध मणिकर्णिका घाटच उद्ध्वस्त केला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी योगी सरकारवर केला आहे.त्या स्पष्ट शब्दांत म्हणतात—इतिहास, संस्कृती आणि धर्माचा वारसा असलेली स्थळे जतन होणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने “विकास” या ब्रँडिंगखाली जी तोडफोड सुरू आहे, ती विदारक आहे आणि मन विषण्ण करणारी आहे.यशोमती ठाकूर यांचा आरोप फक्त काशीपुरता मर्यादित नाही.त्या आठवण करून देतात—
दिल्लीमध्ये RSS भवनासाठी प्राचीन मंदिर पाडण्यात आले
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी जंगलतोडीचा डाव आखला गेला
पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाखालीही तोडफोडीचे नियोजन सुरू आहे
“भाजपला जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची कणभर तरी जाणीव असती, तर अशी कृत्ये कधीच झाली नसती,” असा थेट टोला त्यांनी लगावला आहे. राजकारणासाठी आणि सत्तेसाठी अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करायचा, आणि दुसरीकडे त्यांचे विचार, कार्य आणि शिकवण पुसून टाकायची—हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतोय—विकासाच्या नावाखाली आपण आपलाच इतिहास पुसतोय का?मणिकर्णिका घाटासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांचं भवितव्य काय, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
