
अमरावती: जेव्हा समाजशास्त्राचे विद्यार्थी पुस्तकं बाजूला ठेवून थेट मैदानात उतरतात, तेव्हा निर्माण होतो एक अनोखा अनुभव! संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच घेतली मतिमंद मुलांच्या निवासी शाळेची भेट आणि या भेटीने सर्वांच्याच हृदयाला स्पर्श केला. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सुरू झालेली ही भेट शेवटी बनली भावनांच्या अनोख्या बंधनाची कहाणी. विद्यार्थ्यांनी मतिमंद मुलांसोबत नृत्य केलं, गाणी गायली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून स्वतःच भावूक झाले.या प्रसंगी डॉ. के. बी. नायक यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. “मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शासनच नव्हे तर समाजानेही पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे,” असं ते म्हणाले.शाळेचे मुख्याध्यापक उमेश धुमाळे यांनी या मुलांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक अडचणींची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मुलांना फळं आणि खाऊ वाटली. डॉ. नायक यांनी विद्यापीठ स्तरावर या विषयावर संशोधन होण्याची गरज व्यक्त करताना सांगितलं की, “नवीन संशोधनातून मतिमंद मुलांना समाजात प्रतिष्ठेने जगण्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देता येतील.”या उपक्रमात डॉ. के.यु. राऊत, डॉ. प्रशांत भगत, डॉ. रोहिणी देशमुख, प्रा. साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, संशोधक विद्यार्थी निर्मल काळबांडे, राजकुमार सरयाम, रमेश पवार, गोपाल वानखडे यांच्यासह अनेक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीनं विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव रुजवण्यासोबतच, समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे – मतिमंद मुलांनाही आपल्या प्रेमाची, आपल्या साथीची गरज आहे!
