
देशाच्या हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात ऐशोआराम करणारे विजय माल्या आणि ललित मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वादळी वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही स्वतःला “देशातले सर्वात मोठे भगोडे” म्हणत असताना दिसत आहेत. त्यातच भारतीय शासन आणि प्रशासनाची खिल्ली उडवणारी त्यांची वृत्ती पाहून देशभरातील नेटकरी आणि जनता संतापाने भडकली आहे. लंडनमधील एका पार्टीत शॅम्पेनच्या ग्लासेस हातात घेऊन हा धिंगाणा करताना माल्या आणि मोदी दिसत आहेत. भारतीय कायद्याला आणि न्यायव्यवस्थेला टिंगल उडवणाऱ्या या लुटारूंच्या या वृत्तीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. “हे आपल्या देशाची लाज आहे”, “कायद्याला काय झालं?”, असे संतप्त सूर नेटकऱ्यांकडून ऐकू येत आहेत.
या प्रकाराला उत्तर देताना माजी आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक हँडलवरून टोलेदार शब्दांत मोदी सरकारची कडाडून टीका केली आहे. यशोमती ताई म्हणतात, “IPL घोटाळ्यातील हा ललित मोदी आणि कर्ज बुडवून पळून गेलेला विजय माल्या मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे परदेशात ऐशोआरामात, धुंदीत आहेत. लंडनमध्ये पार्टीत ललित मोदी गर्वाने सांगतोय की आम्ही भारतातले सर्वात मोठे भगोडे आहोत! भारताची, इथल्या कायदा सुव्यवस्थेची परदेशातून टिंगल उडवत आहेत हे लोक.”
त्या पुढे म्हणतात, “धनदांडग्या भांडवलदारांना मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून जी खुली सूट दिली त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती देखील कमकुवत झाली आहे. आज डॉलर ९० पार गेला आहे. लुटारू परदेशात पार्ट्या करत आहेत आणि इथे मनरेगाचे खच्चीकरण करून सामान्य जनतेचा हक्काचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. वाह मोदी जी वाह!”
यशोमती ठाकूरांच्या या टीकेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेक नेटकरी त्यांच्या मताशी सहमत असून सरकारला कठोर प्रश्न विचारत आहेत. तर काहीजण यशोमती ठाकूरांच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत. विजय माल्या यांच्यावर बँकांच्या हजारो कोटींच्या कर्जबुडवणुकीचे आरोप आहेत तर ललित मोदी यांच्यावर IPL घोटाळ्याचे गंभीर आरोप आहेत. दोघेही भारतीय कायद्यापासून दूर राहून परदेशात आलिशान जीवन जगत आहेत. हा प्रकार पुन्हा एकदा देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे. जनता विचारत आहे – सामान्य नागरिकांसाठी कायद्याच्या काटेकोर अमंलबजावणी होते, पण मोठ्या माणसांसाठी कायदे का शिथिल होतात? हा प्रश्न आता केवळ विरोधकांचा नाही तर सामान्य जनतेचाही झाला आहे.
