अमरावतीत हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांचे निधन, साहित्य विश्वावर शोककळा

mirza express

अमरावती, दि. 28 – महाराष्ट्राला खळखळून हसवणारे, ‘मिर्झा एक्सप्रेस’चे जनक आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दुःखद निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज–माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावतीतील वलगाव रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि दोन मुली महाजबी व हुमा असा परिवार आहे. आज दुपारी दोननंतर अमरावतीतील ईदगा कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. मिर्झा हे केवळ कवी नव्हते, तर लाखो चाहत्यांच्या मनात घर करणारे लोककवी होते. त्यांनी तब्बल 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ या कार्यक्रमातून 6 हजारांहून अधिक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सादर केले. शेती, शेतकरी, गावखेडं, समाजकारण आणि राजकारणावर त्यांनी नर्म विनोदात भाष्य केलं.

वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. “जांगडबुत्ता”सारखा शब्द त्यांनी दिला, तर “मोठा माणूस”, “सातवा महिना”, “उठ आता गणपत” अशा कविता आजही लोकांच्या ओठावर आहेत. दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम गाजत राहिले.

धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारी त्यांची काव्यशैली होती. म्हणूनच ते सर्वधर्मीयांचे लाडके कवी होते.

डॉ. मिर्झा यांच्या जाण्याने वऱ्हाडी भाषा आणि साहित्य क्षेत्राला मोठी हानी पोहोचली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *