“निवडणूक संपली की बहिणी विसरल्या!” – भंडारा-यवतमाळमध्ये महामार्ग रोको आंदोलन, लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी महिलांचा हाहाकार

भंडारा/यवतमाळ: निवडणुकीच्या वेळी सरकारला लाडक्या बहिणी आठवतात पण मतदान संपताच त्यांचा विसर पडतो का? भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांना हाच प्रश्न पडला आहे. नोव्हेंबर २०२५ पासून लाडकी बहीण योजनेचा एक पैसाही त्यांच्या खात्यात आलेला नाही!माजी आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून या प्रकाराचा पर्दाफाश करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

का थांबले पैसे?

राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. कुठे लाभार्थ्यांची नावे यादीतूनच गायब झाली तर कुठे त्यांना अचानक अपात्र ठरवण्यात आलं आहे. केवायसी (KYC) करूनही पैसे न आल्याने महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रस्त्यावर उतरल्या लाडक्या बहिणी

भंडाऱ्यात संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राष्ट्रीय महामार्गावर जाम केला. जवळपास दीड तास महामार्ग रोखून धरला गेला. तर तीन-चार दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनीही जिल्हा महिला बालविकास कार्यालयावर धडक दिली होती.

“दुटप्पी धोरण”चा आरोप

यशोमती ताई ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं आहे की, “निवडणूक आली की सरकारला लाडक्या बहिणी आठवतात. निवडणूक संपताच या लाडक्या बहिणींचा विसर पडतो. महायुती सरकारचे हे दुटप्पी धोरण भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी उघड केले आहे.”आता प्रश्न असा की, सरकार या महिलांना न्याय देणार की निवडणूक आली की पुन्हा आश्वासनांचा पाऊस पाडणार? लाडक्या बहिणींची वाट पाहणं सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *