
बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. GST विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेतील विषबाधेची कहाणी सांगते.माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नमूद केलं की, सचिन जाधवर हे कोणतेही सामान्य अधिकारी नव्हते. २०१२ साली MPSC विक्रीकर निरीक्षक परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. असा हुशार, मेहनती आणि प्रतिभावान अधिकारी आजच्या घाणेरड्या प्रशासकीय राजकारणाचा बळी ठरला, हे अत्यंत दुर्दैवी आहे.यशोमती ठाकूर यांनी आपल्या पोस्टमध्ये कडक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणतात, “जेव्हा प्रशासनातील वरिष्ठांचे शोषण आणि दबाव इतका वाढतो की कर्तबगार अधिकाऱ्यांना स्वतःचा जीव द्यावा लागतो, तेव्हा हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे.”त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी केली जावी. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनात आमूलाग्र बदल व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.हा प्रकार केवळ बीडचा नाही… महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेतील गळिच्छतेचा आरसा आहे. आता मुख्यमंत्र्यांकडून कसा निर्णय येतो, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
