मादुरोला अटक! अमेरिकेने व्हेनेझुएलावर का केला हल्ला? तेलाच्या आहारी गेली लोकशाही!

why us attack on venezulia?

ब्रेकिंग: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतलं आहे. ब्रुकलिनच्या मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये दोघांनाही कैद करण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी USS Iwo Jima या युद्धनौकेवर डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या मादुरोचा फोटो शेअर केला आहे. पण प्रश्न असा आहे की – एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिका अशी अटक कशी करू शकतं? आणि हे सगळं का घडतंय?

ड्रग्ज की तेल? खरं कारण काय?

ट्रम्प प्रशासन म्हणतंय की मादुरो हे जगातील सर्वात धोकादायक ड्रग तस्करांशी हातमिळवणी करून अमेरिकेत दरवर्षी 250 टन कोकेन पाठवत होते. सिनालोआ कार्टेल आणि ट्रेन दे अरागुआ सारख्या क्रूर गँग्जना संरक्षण देत होते. 2020 सालीच मॅनहॅटन फेडरल कोर्टात त्यांच्यावर केस दाखल झाली होती.

पण बाजारातले तज्ञ काहीतरी वेगळंच सांगतायत! “खरं कारण म्हणजे पेट्रो-डॉलरची सुरक्षा!” बसव कॅपिटलचे सह-संस्थापक संदीप पांडे यांनी स्पष्ट केलं. “ह्यूगो चावेझच्या काळापासून व्हेनेझुएला या व्यवस्थेला आव्हान देत होता. ट्रम्प यांचं तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचं विधान हेच सिद्ध करतं.”

“आम्हीच चालवू देश!” – ट्रम्प

मार-अ-लागो येथील पत्रकार परिषदेत ट्रम्प गर्जले, “योग्य आणि सुरक्षित सत्तांतरण होईपर्यंत आम्हीच व्हेनेझुएला चालवू.” अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलाच्या ढासळलेल्या तेल उद्योगाचं पुनर्वसन करायला पाठवण्याची घोषणाही त्यांनी केली. “आम्हाला जमिनीवर सैन्य उतरवायला भीती वाटत नाही,” ट्रम्प यांचा इशारा स्पष्ट होता.

संविधानाचा प्रश्न उभा

अमेरिकन सिनेटर बर्नी सँडर्स यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “ट्रम्प यांना दुसऱ्या देशावर हल्ला करण्याचा संवैधानिक अधिकार नाहीये. 60% अमेरिकन लोक दारिद्र्यात जगतायत, त्यांनी घरातल्या समस्या सोडवाव्यात, मोठ्या तेल कंपन्यांसाठी व्हेनेझुएला ‘चालवू’ नका!” कायदेतज्ञही या कारवाईच्या कायदेशीरपणावर प्रश्नचिन्ह उभं करतायत.

तेलाच्या किमतींवर काय परिणाम?

व्हेनेझुएला दररोज फक्त 10 लाख बॅरल तेल उत्पादन करतो – जागतिक पुरवठ्याचा फक्त 1%. त्यामुळे या हल्ल्याचा तात्काळ मोठा परिणाम होणार नाही असं तज्ञ म्हणतात. शनिवारी वेस्ट टेक्सास क्रूड $57.32 वर घसरलं. पण या वेल्थचे अनुज गुप्ता यांचं म्हणणं वेगळं आहे. “सोमवारी बाजार उघडला की ब्रेंट क्रूडची किंमत $62-65 पर्यंत जाऊ शकते. सोनं, चांदी, तांबं सगळ्याच्या किमती वाढतील.”

‘आमचे तेलाचे हक्क परत घ्या!’

ट्रम्प म्हणाले, “व्हेनेझुएलाने वर्षांपूर्वी आमचे तेलाचे हक्क हिरावून घेतले.” हा इशारा स्पष्ट आहे – राष्ट्रीयीकरणाने जे हक्क गेले, ते परत मिळवायचे आहेत अमेरिकन कंपन्यांना. पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे – व्हेनेझुएलामध्ये अजूनही मादुरो प्रशासन सत्तेवर आहे. जमिनीवर अमेरिकेचं कोणतं नियंत्रण नाहीये. आणि कराकसमध्ये वॉशिंग्टनशी बोलण्याची तयारीही दिसत नाहीये.

तर मग हे सगळं राजकीय नाटक आहे की खरंच अमेरिका व्हेनेझुएला ताब्यात घेणार? येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित – तेलाच्या खेळात लोकशाही पुन्हा एकदा बळी झाली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *