
बडनेरा – एका चौकवाणाऱ्या घटनेने बडनेरा शहरात खळबळ उडाली आहे. अवघ्या 17 वर्षे 6 महिन्यांचा कुणाल विनोद तेलमोरे याला रेल्वे परिसरात बोलावून घेऊन दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकरणी क्राईम ब्रँचने वीज वेगाने कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे, त्यात दोन अल्पवयीन आहेत.पवारवाडी तेलीपुर परिसरातील रहिवासी कुणाल तेलमोरे याला अज्ञात व्यक्तीने रेल्वे परिसरात बोलावून घेतलं होतं. कुणाल तिथे पोहोचताच काय घडलं याची कल्पनाही त्याला नव्हती. त्याच्यावर अचानक दगडांचा भडिमार करण्यात आला आणि काही क्षणांतच त्याचा जीव गेला.या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण, क्राईम ब्रँचचे पथक, रेल्वे पोलीस आणि आरपीएफची टीम धावत घटनास्थळी पोहोचली. डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपासाला जोर दिला.क्राईम ब्रँचचे अधिकारी संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सर्व आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.या निर्दयी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका तरुणाचं असं निर्घृण खून का करण्यात आलं, याचा खुलासा तपासात होणार आहे.
