परतवाडा–अमरावती मार्गावर टिप्परची दुचाकीला भीषण धडक, सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी संतोष गौर यांचा जागीच मृत्यू

दि. 28-12-2025. परतवाडा–अमरावती स्व. कुणाल डीपे मार्गावर आज सकाळी घडलेला अपघात अक्षरशः काळीज हादरवणारा ठरला. मुरुम-वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परने (MH 27 BK 1970) एका दुचाकीस्वाराला (MH 27 BH 9127) जोरदार धडक दिली आणि त्यात सुप्रसिद्ध भाजीपाला विक्रेते संतोष सियारामजी गौर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे संतोष गौर सकाळी लवकर परतवाड्याच्या दलाली मंडीत भाजीपाला आणण्यासाठी निघाले होते. मात्र नियतीने त्यांच्या वाट्याला हा काळा दिवस लिहिला होता. टिप्परची धडक इतकी भीषण होती की त्यांची दुचाकी अक्षरशः छिन्नविछिन्न झाली. अपघाताची तीव्रता पाहून घटनास्थळी उपस्थितांचे मन सुन्न झाले.अपघातानंतर संतोष गौर यांचे पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने भाजीपाला व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर शब्दांत संताप दिसून येत आहे.स्थानिकांनी पुन्हा एकदा स्व. कुणाल डीपे महामार्गाच्या अरुंद रस्त्यावर बोट ठेवले आहे. रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण सुटल्याने येथे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.हा अपघात केवळ एक बातमी नाही, तर निष्पाप कुटुंबाचा आधार हिरावून नेणारी वेदना आहे. रस्त्यांची सुरक्षितता, जड वाहनांवर नियंत्रण आणि जबाबदार वाहतूक—हे सगळं आता केवळ चर्चा न राहता तात्काळ कृती बनणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *