
ना गर्दी, ना टाळ्या… पण हृदय जिंकणारा क्षण व्हायरल
गुमी (दक्षिण कोरिया) – कल्पना करा, तुम्ही आयुष्यभराच्या मेहनतीनंतर सुवर्णपदक जिंकलात, राष्ट्रीय विक्रम मोडलात, पण स्टेडियम पूर्णपणे रिकामं आहे. ना कोणी टाळ्या वाजवणारा, ना जल्लोष करणारा… फक्त शुकशुकाट आणि तुमचा तिरंगा!असाच एक भावूक क्षण भारतीय महिला हर्डलर ज्योती याराजीच्या वाट्याला आला. दक्षिण कोरियातील गुमी येथे 27 ते 31 मे दरम्यान पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये तिने 100 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. फक्त 12.96 सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिने नवा चॅम्पियनशिप विक्रमही प्रस्थापित केला.
रिकाम्या स्टेडियममध्ये फडकला तिरंगा, अनावर झाले अश्रू
पण विजयानंतरचा तो क्षण… त्या क्षणाने संपूर्ण देशाचं हृदय हेलावून सोडलं. जेव्हा भारताचा राष्ट्रगीत वाजला आणि तिरंगा आकाशात फडकला, तेव्हा स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी नव्हती. कोणी टाळ्या वाजवत नव्हता. संपूर्ण मैदानावर फक्त निस्तब्धता पसरली होती.अशा शांततेत, पोडियमवर उभी असलेल्या ज्योतीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती स्वतःलाच विचारत होती – “इतक्या मेहनतीनंतर, इतक्या संघर्षानंतर… आणि आज कोणीच नाही साजरं करायला?” हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लाखो भारतीयांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आणि ज्योतीला आपलं प्रेम आणि सन्मान व्यक्त केलं.
18 हजार रुपयांच्या उत्पन्नातून विश्वविजेत्या बनलेली मुलगी
ज्योती याराजीचा जन्म 28 ऑगस्ट 1999 रोजी विशाखापट्टणम येथे एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. तिचे वडील सूर्यनारायण खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर आई कुमारी रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आहेत. त्याचबरोबर घरकामही करून ते कुटुंबाला हातभार लावतात.याचा अर्थ काय माहीत आहे का? कुटुंबाचं मासिक उत्पन्न फक्त 18 हजार रुपयांपेक्षाही कमी होतं! या मर्यादित पैशातून घरखर्च, मुलांचं शिक्षण, प्रशिक्षणाचा खर्च… सगळं सांभाळायचं. अनेकदा खेळाचे साधनसुविधा खरेदी करायलाही आर्थिक अडचणी येत असत.पण ज्योतीने हार मानली नाही. लहानपणीच तिने ठरवलं होतं – “मला भारताचं नाव उज्ज्वल करायचं आहे.” आणि तिने ते करून दाखवलं!
भारताची गर्वास्पद कामगिरी – 24 पदकांचा विक्रम
या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकंदर अफाट कामगिरी केली. 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्यपदकांसह एकूण 24 पदकं जिंकत भारताने पदकतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. ज्योती याराजी या भारतीय संघातील स्टार अॅथलीट ठरली.
विक्रमांची झालर – ज्योतीची खास उपलब्धी
ज्योतीने आतापर्यंत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 100 मीटर हर्डल्समध्ये 12.78 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम तिच्याच नावे आहे. तिने 20 वर्षांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडून काढला. 60 मीटर हर्डल्स (इनडोअर) मध्ये 8.13 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रमही तिनेच प्रस्थापित केला आहे.2023 मध्ये बँकॉकमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कांस्यपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक… तिची उपलब्धींची यादी प्रदीर्घ आहे. 2024 साली भारत सरकारने तिला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार देऊन गौरवलं.
प्रेरणास्थान ज्योती
ज्योती याराजीची कहाणी फक्त क्रीडेविषयी नाही. ती आहे अटूट इच्छाशक्तीची, कठोर परिश्रमाची आणि स्वप्नांना खऱं करण्याच्या जिद्दीची कहाणी. रिकाम्या स्टेडियममध्येही जेव्हा तिरंगा फडकला, तेव्हा संपूर्ण देशाचं हृदय तिच्यासोबत होतं.आज लाखो युवकांसाठी ज्योती याराजी ही जिवंत प्रेरणा आहे. तिचा संदेश स्पष्ट आहे – परिस्थिती कितीही कठीण असली तरी, जर मनात स्वप्न असेल आणि त्याला साकार करण्याची जिद्द असेल, तर यश नक्की मिळतं!
