
अमरावती, दि. 19 डिसेंबर — आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी 2025 लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा मूळतः 14, 15 आणि 16 जानेवारी 2026 पासून सुरू होणार होत्या.
आता या परीक्षांच्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे असतील — 14 जानेवारीच्या परीक्षा 27 जानेवारीला, 15 जानेवारीच्या परीक्षा 28 जानेवारीला, तर 16 जानेवारीच्या परीक्षा 29 जानेवारीला होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाचे आवाहन आहे. संबंधित महाविद्यालये, केंद्राधिकारी आणि परीक्षा केंद्रांना याबाबत अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नव्या तारखांनुसार तयारी ठेवावी आणि कोणत्याही शंकेसाठी परीक्षा विभागाशी किंवा अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा.”
