
मुंबई – महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जगप्रसिद्ध फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या क्षणाने राज्याच्या फुटबॉल प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या 60 होतकरू फुटबॉलपटूंना तब्बल पाच वर्षांची निवासी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूंना लिओनेल मेस्सी यांच्याकडून थेट मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूकडून शिकण्याची ही संधी तरुणांसाठी स्वप्नपूर्तीच ठरत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“लिओनेल मेस्सीसारख्या महान खेळाडूचे महाराष्ट्रात स्वागत करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये चमकण्याची क्षमता असलेल्या आमच्या 60 मुलांना ते मार्गदर्शन करत आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा राज्य शासनाचा दूरदृष्टीने आखलेला उपक्रम असून, 13 वर्षांखालील वयोगटातील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेऊन जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पात शिष्यवृत्तीबरोबरच परदेशी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. हा उपक्रम MITRA, VSTF, WIFA, CIDCO आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहे. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकूणच, “क्रिकेटपलीकडेही भारताचं स्वप्न” साकार करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने आज मोठं पाऊल टाकलं असून, फुटबॉलमध्येही जगात आपली छाप उमटवण्याचा निर्धार स्पष्ट दिसतोय.
