अमरावतीच्या विकासावर मुख्यमंत्र्यांचा भर; अपूर्ण कामे लवकर पूर्ण करा – फडणवीसांचे निर्देश

amravati news

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूरच्या विधान भवनात अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक झाली. यावेळी अमरावती शहरातील विकासकामे करताना भविष्यात त्याचा उपयोग होईल, याची काळजी घेऊनच प्रकल्प निवडावेत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सध्या शहरात सुरू असलेली पण अपूर्ण असलेली कामे आधी पूर्ण करा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आवश्यक तरतूद करून प्रकल्प मार्गी लावा, असे निर्देशही त्यांनी दिले. राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची बांधकामाची मुदत संपल्याने शहरात वाहतूक कोंडी वाढली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महारेलकडून पुलाच्या मजबूत पुनर्बांधणीबाबत मार्गदर्शन घ्यावे, असे सांगण्यात आले. तसेच अमरावतीत आयटी पार्क उभारण्याबाबत स्थानिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन रोजगारनिर्मिती होईल, अशा पद्धतीने प्रकल्प राबवण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमृत योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या वाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. जुन्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित झाल्यावरच नवीन प्रकल्प हाती घ्यावेत. प्रकल्प उभा केल्यानंतर त्याची देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेच्या मिळणाऱ्या महसूलातूनच कशी करता येईल, याचे नियोजन आधीच करा, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. छत्री तलावाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जात असून, नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भूमिगत गटारांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे. विभागीय मुख्यालय असूनही अमरावतीत फक्त 20 टक्के भागातच गटारे आहेत. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने गटार योजना वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. नेहरू मैदान परिसरातील जुनी लाल शाळा आणि टाऊन हॉलच्या बांधकामाचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात आला असून आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगण्यात आले.

विकासकामे करताना नेहरू मैदान कायम ठेवण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेता, प्रत्यक्ष जागेची पाहणी करून रस्ते, नाले, सांडपाणी व्यवस्था, दुकाने, भाविकांसाठी सुविधा आणि वाहनतळ यांचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. हनुमानगढी हे नव्याने विकसित होत असलेले धार्मिक व पर्यटनस्थळ असून, याठिकाणी स्थानिक बांधकाम साहित्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पांना टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, असेही सांगण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पीएम मित्रा पार्क अंतर्गत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीने जमिनीचे दर कमी करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रवी राणा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *