
विदर्भात आणि विशेषत: अमरावती भागात गेल्या काही दिवसांपासून थंडी जोरात जाणवतेय. उत्तरेकडून सतत येणारे थंड, कोरडे वारे आणि पूर्णपणे स्वच्छ आकाश यामुळे रात्रीचं तापमान अक्षरशः खाली कोसळत आहे. त्यामुळे सकाळी उठताना सर्वांनाच गारठा जाणवतोय. हवामान खात्याच्या मते ही थंडी अजून काही दिवस तरी कमी होणार नाही. मात्र त्यानंतर तापमानात थोडी वाढ होऊ शकते.
आत्ता तापमानाची काय स्थिती?
राज्यातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमान सरासरीपेक्षा 2–4 अंशांनी कमी नोंदवलं जातंय. त्यामुळे ‘कोल्ड वेव्ह’सारखी परिस्थिती आहे.
नागपूर, गोंदिया, यवतमाळसह विदर्भातील भागात पारा 8–10 अंशांवर जातोय.
अमरावती परिसरातही तापमान 10–11 अंशांच्या आसपास घसरल्याचं नोंदवलं गेलंय.
IMD ने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी थंडीचा यलो अलर्ट (yellow Alart) दिलाय.
ही थंडी एवढी जोरात का जाणवते?
उत्तर भारतातील थंड वार्यांचे थरारक प्रवाह थेट मध्य भारतावर येत असल्याने तापमान पटकन खाली येतं. आकाश पूर्ण स्वच्छ असल्याने रात्री पृथ्वीची उष्णता वेगाने बाहेर जाते, त्यामुळे पहाटेपर्यंत गारठा अजूनच वाढतो. हवा पूर्णपणे कोरडी, आर्द्रता कमी आणि वाऱ्याचा वेग जास्त — त्यामुळे ‘रिअल फील’ तापमान आणखी कमी वाटतं.
थंडी आणखी किती दिवस?
IMD च्या अंदाजानुसार विदर्भात 13 डिसेंबरपर्यंत काही ठिकाणी कोल्ड वेव्हचा प्रभाव राहू शकतो.
पुढचे 5–7 दिवस तापमानात मोठा बदल नाही — म्हणजेच पहाटेची कडाक्याची थंडी तशीच सुरू राहणार. त्यानंतर तापमानात 2–3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता. म्हणजे थंडी थोडी कमी होईल, पण डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारवा ठळकच राहील.
नागरिकांसाठी सूचना
सकाळी आणि रात्री बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करा.
शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तापमानात होणाऱ्या घसरणीकडे विशेष लक्ष द्यावे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा/हृदयाच्या तक्रारी असणाऱ्यांनी थंडीत काळजी घ्यावी.
