
सातारा जिल्ह्यातील एक हृदयद्रावक प्रकार घडला आहे. देशाच्या सीमेवर सेवा देणारा एक वीर जवान पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आला होता, पण नशीबाने असे वळण घेतले की त्याला आपल्या नवजात मुलीचे मुख पाहायला मिळाले नाही.सातारा तालुक्यातील दरे (पोस्ट आरे) येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यातील जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरी गृह परिसरात भीषण अपघातात मृत्यू झाला. पत्नीची डिलिव्हरी होणार असल्याने आनंदात असलेला हा परिवार अवघ्या काही तासांतच शोकसागरात बुडाला.
नियतीचा क्रूर खेळ
अत्यंत वेदनादायक बाब म्हणजे, जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नीने एका कन्यारत्नास जन्म दिला. पत्नीच्या प्रसूतीसाठी फक्त आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेला हा जवान आपल्या लेकीचे मुख पाहू शकला नाही. पित्याच्या छत्रछायेशिवाय जन्माला आलेल्या त्या चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एका बाजूला नवजात मुलीच्या आगमनाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला पित्याच्या जाण्याचे असह्य दुःख – अशी ही काळजाला चटका लावणारी घटना सर्वांच्या मनात खोलवर घर करून गेली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात हळहळ
देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा देणारा हा जवान सुट्टीवर असतानाच अशा प्रकारे अपघातात गमावला जाणे, ही घटना अत्यंत दुःखद असून संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, नवजात कन्या आणि वडील असा परिवार आहे.
