
कोल्हापूर.सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये नऊवारी साडी नेसलेली आई, घोंगडं घेतलेले वडील आणि मध्ये गणवेशात उभा असलेला IPS मुलगा दिसतोय. हा फोटो पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. पण या फोटोमागची कहाणी ऐकली की तुम्हालाही अभिमान वाटेल!
मेंढ्या चारणाऱ्या पोराने गाठली IPS ची उंची
कोल्हापूरच्या यमगे गावातल्या एका साध्या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला बिरदेव सिद्धापा डोणे आज IPS अधिकारी बनला आहे. धनगर समाजातून आलेल्या बिरदेवने UPSC परीक्षेत ५५१ वी रँक मिळवली आहे. लहानपणी मेंढ्या चारत शिकणारा हा मुलगा आज देशाची सेवा करण्यासाठी तयार झाला आहे. संसाधनांचा अभाव होता, पण जिद्द अपार होती. दहावी-बारावीमध्ये चांगले गुण मिळवले, इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मग सुरू केला UPSC चा खडतर प्रवास.
पहिल्यांदा विमानात बसले आई-बाबा
सध्या बिरदेव नॅशनल पोलीस अकॅडमी, हैदराबाद येथे ट्रेनिंग घेतोय. IPS अधिकारी झाल्यानंतर त्याने सर्वात पहिले काम म्हणजे आपल्या आई-वडिलांना विमान प्रवास घडवून दिला. आयुष्यभर उन्हातानात मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या, घोंगडं अंगावर घेऊन दिवस काढणाऱ्या आपल्या आई-बापांना बिरदेवने पहिल्यांदा विमानात बसवलं. नऊवारीत आई, घोंगड्यात बाबा आणि मध्ये गणवेशात अभिमानाने उभा असलेला मुलगा – हा फोटो संघर्ष आणि यशाची जिवंत कहाणी सांगतोय.
परिस्थिती नाही, मेहनत माणसाला मोठं बनवते
बिरदेवची कहाणी प्रत्येक साध्या घरातल्या स्वप्न पाहणाऱ्या मुलाला प्रेरणा देते. आई-वडिलांच्या त्यागाची किंमत ओळखणाऱ्या या IPS अधिकाऱ्याने सिद्ध केलंय की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश मिळवता येतं.बिरदेव डोणे यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!
