पती-पत्नीच्या वादातून थेट आगजनी! कार डेकोरच्या गोदामाला आग, 60 लाखांचे नुकसान

शहरात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून पत्नीने थेट पतीच्या कार डेकोरच्या गोदामालाच आग लावल्याची धक्कादायक घटना आज रविवार, 7 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास दशहरा मैदानासमोर घडली. या आगीत गोदामातील संपूर्ण माल जळून खाक झाला असून सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.श्रि नगर परिसरातील मनीष शंकरराव सावरकर यांचे दशहरा मैदानासमोर श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ‘न्यू वेलकम कार डेकोर’ नावाचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर कार डेकोरचा मोठा गोदाम आहे. काही दिवसांपासून मनीष आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती वाद सुरू होता. याच कारणावरून शनिवारी पत्नीने दुकानात येऊन मारहाण व दगडफेक केल्याची तक्रारही राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

आज रविवार असल्याने परिसरातील बहुतांश दुकाने बंद होती आणि शांतता होती. याच संधीचा फायदा घेत मनीष यांच्या पत्नीने दुकानामागील बाजूने गोदामात प्रवेश करत चावीने कुलूप उघडले आणि आत आग लावून घटनास्थळावरून पसार झाली. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले.पहिल्या मजल्यावरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच गोंधळ उडाला. तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. दमकल विभागाच्या 2 ते 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि समोरून व मागच्या बाजूने पाण्याचे बंब सोडत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने शेजारच्या शो-रूम आणि वरच्या फ्लॅटमधील कुटुंबे सुरक्षित राहिली.तोपर्यंत मात्र गोदामातील संपूर्ण कार डेकोरचा माल पूर्णपणे जळून खाक झाला होता. या प्रकरणी मनीष सावरकर यांनी पत्नीविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्येही पत्नी गोदामाकडे जाताना आणि आग लावून पसार होताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *