
व्हायरल डीपफेक व्हिडिओनंतर गिरीजा ओकने केला मोकळेपणाने बोलण्याचा निर्णय; ‘संमती’च्या मुद्द्यावर दिलं ठणकावून उत्तर!
मुंबई – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओवरून अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांनी आपले मन मोकळे केलं आहे. पण तिच्या प्रतिक्रियेने सगळ्यांनाच विचार करायला लावला आहे!”आम्हाला तर फक्त हसू आलं!” गिरीजाने एका मुलाखतीत सांगितलं की जेव्हा तो एआय तंत्रज्ञानाने बनवलेला मॉर्फ व्हिडिओ तिने आणि तिचे पती सुहृद गोडबोले यांनी पाहिला, तेव्हा त्यांना धक्का नाही तर हसूच आलं! का? कारण तो व्हिडिओ इतका बनावट आणि निकृष्ट दर्जाचा होता की, कोणालाही ती खरी नाही हे समजलं असतं. “आम्ही या क्षेत्रात काम करतो, आमच्या घरच्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे. त्यामुळे आम्हाला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरजच पडली नाही,” असं गिरीजाने म्हटलं.पण खरी चिंता कुणाची? गिरीजाने मात्र या प्रकरणावर आवाज उठवण्यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं .
सामान्य मुलींची सुरक्षा!
“मी प्रिव्हिलेज्ड आहे, माझं कुटुंब मला समजून घेईल. पण विचार करा, हेच जर एखाद्या सामान्य मुलीसोबत घडलं असतं तर? जी मुलगी खेड्यातून शहरात नोकरीसाठी आली आहे, जिच्या आई-वडिलांना ‘एआय’ किंवा ‘डीपफेक’ म्हणजे काय हेच माहीत नाही… अशा मुलीचे फोटो मॉर्फ झाले तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तिला निर्दोष सिद्ध करणं किती कठीण जाईल याची कल्पना करा!”गिरीजाचा हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे.
ट्रोलर्सना सडेतोड उत्तर!
काही लोकांनी गिरीजाला ट्रोल करताना विचारलं होतं, “तुम्ही पडद्यावर बोल्ड सीन्स देता, मग अशा फोटोंचा काय त्रास?” या प्रश्नावर गिरीजाने जबरदस्त उत्तर दिलं: “पडद्यावर मी काय कपडे घालते किंवा कोणते सीन्स करते, तो माझा निर्णय आहे आणि तिथे माझी संमती असते. पण एआयने तयार केलेल्या फोटोंमध्ये माझी परवानगी नाही. माझ्या इच्छेशिवाय माझ्या फोटोचा असा वापर करणे हा गुन्हा आहे. ‘संमती’चा हाच फरक लोकांनी समजून घेतला पाहिजे!”
संदेश स्पष्ट आहे
गिरीजाचा संदेश फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येक महिलेसाठी आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कोणाचंही चारित्र्यहनन करणं ही गंभीर बाब आहे आणि यावर कायद्याने कडक कारवाई व्हायला हवी.तुम्हाला गिरीजाच्या या विचारांबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा!
