अमरावती विद्यापीठात भ्रष्टाचार विरोधी दिन आणि मानवाधिकार दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून सामाजिक बांधिलकीची प्रचीती

sgbau amravati university news

अमरावती – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आणि मानवाधिकार दिन विशेष उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात पारदर्शकता, नैतिकता आणि मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठ परिसरात उतरत श्रमदानाचा उपक्रम राबवला, आणि आपली सामाजिक जबाबदारी प्रभावीपणे दाखवून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की, “भ्रष्टाचार हा देशाच्या विकासाचा सर्वात मोठा अडथळा आहे. तरुणांनी प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना बाळगली, तर समाजात मोठा बदल घडू शकतो.” तसेच मानवाधिकार हे प्रत्येक माणसाचे जन्मजात हक्क असून, त्यांचे रक्षण करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक आणि प्राध्यापकांनी मोठ्या ऊत्साहात सहभाग घेतला. परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन जनजागृती, वृक्षतळांची साफसफाई, स्वच्छ परिसर अभियान अशा विविध कामांमधून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श उभा केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना मानवाधिकारांचे महत्त्व, संयुक्त राष्ट्रांचे उपक्रम, तसेच भ्रष्टाचार विरोधी संकल्पनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या विषयांवर विशेष रस घेत चर्चा केली.

कार्यक्रमाचे संचालन कु. एन. एन. काळे यांनी केले, तर कु. साक्षी भगत यांनी आभार मानले. यावेळी विभागातील डॉ. प्रशांत भगत, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. रोहिणी वावरे, प्रा. साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, श्री. प्रवीण गडलिंगकर तसेच विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *